Ad will apear here
Next
अगतिक मातृत्व.
*अगतिक मातृत्व*. 
दुपारचा दिड वाजत आला होता,आज सुमनला सकाळची धुण भांड्यांची काम आटोपुन घरी जायला जरा वेळच झाला होता. चार वाजता तीला परत सिन्हा बाईंकडे कीटी पार्टी असल्यामुळे कामावर जायचे होते, तीला सध्या काळजी लागली होती ती घरी एकटा असलेल्या आपल्या पोराची, दिपकची. सुमनचा नवरा रिक्षा चालवायचा त्यामुळे त्याची घरी येण्याची अशी ठराविक वेळ नव्हती. दिपकचे सगळे काम सुमनलाच करावे लागत असे.दिपक, सुमनचा मुलगा तेवीस, चोवीस वर्षांचा होता.आता एवढ्या मोठ्या मुलाची कसली काळजी करायची?  बाब त्याच्या वयाची नव्हती,  तो सामान्य मुलांसारखा नसल्यामुळे काळजीची होती.तो वयाने आणि शरीराने जरी वाढला होता तरी बुद्धीने विकसीत नव्हता. तो अॅबनाॅर्मल होता. त्याचे मन व बुद्धी अगदी चार पाच वर्षांच्या मुलासारखी होती.त्याला आपल्या शरीराचे अजिबात भान नसायचे, कपडे घालून देण्यापासुन ते अगदी त्याला आंघोळ घालुन देण्यापर्यंतची सगळी काम सुमनला करावी लागत होती.त्याला समज अशी नव्हतीच. तो सगळयांच्या टिंगल टवाळीचा विषय होता. दिसायला जरी बरा असला तरी ओंगळवाणा असल्यामुळे त्याच्याजवळ फारसं कोणी येत नसे. लोकांच सोडा पण त्याचा बापही त्याच्याकडे ढुंकून पहात नसे. त्याची सगळी जबाबदारी संपुर्णपणे सुमनवरच होती, तो कसाही असला गलीच्छ, गचाळ, अजागळ, अर्धवट तरी तीचा पोटचा गोळा होता, ती आई होती त्याची.सुमन भरभर चालत घरात शिरली.तीला घरचे सगळे काम आटोपुन परत जायचे होते.    तीने पटकन चुलीवर पाणी गरम करायला ठेवले,पाणी गरम होईतोवर तीने आपल्या घराच्या दोन छोट्या खोल्या आवरुन घेतल्या,  घर कसले, पडवीवजा झोपडीच होती ती,  नंतर गरम पाणी बादलीत काढुन तीने दिपकला आंघोळ घालण्यास बसवले.पण आज तो नेहमीसारखा सामान्य वाटत नव्हता. त्याच्या डोळ्यात चमत्कारिक भाव होते.आज दिपक सहजासहजी सुमनला ऐकत नव्हता. सुमनला त्याच्या असल्या वागण्यात काही विशेष जाणवल नाही,तो असा हट्टीपणा कधीकधी करायचा.तीच्या डोक्यात फक्त दिपकचे आवरुन परत सिन्हा बाईककडे कामावर जाण्याचा विचार चालु होता त्यामुळे तीने दिपकला रागावुन जबरदस्तीने आंघोळीला बसवले आणि ती त्याला आंघोळ घालायला लागली त्यासरशी त्याने तीचा हात धरुन "नको त्या जागी" लावायला सुरुवात केली,त्यासरशी सुमन एकदम दचकली, ती भानावर आली.आज तीची तीलाच लाज वाटली, ती जरी दिपकची आई होती तरी ती प्रथम एक स्त्री होती, आज तीला पहिल्यांदा दिपकचा खुप राग आला.संताप अनावर होऊन तीने त्याला खुप मारले, पण दिपकला त्यातले काहीच कळत नव्हते. आज शरीरधर्माने आपले काम बजावले होते. निसर्गनियमानुसार त्याच्यातील नर शरीराने जागृत केला होता.दिपकला जर एवढी समज असती तर तो वेडा राहीलाच नसता.आईने कशाला मारले हेदेखील त्याला कळले नाही, मुकाट्याने आईजवळ येऊन तीच्या हातातील टाॅवेलने अंग पुसायचा त्याचा प्रयत्न चालला होता.सुमन मात्र गलितगात्र होऊन त्याच्याकडे नुसतीच पहात बसली होती.   कसबस स्वतःला सावरुन सुमनने दिपकला स्वच्छ केले, त्याला कपडे घालुन पलंगावर बसवले आणि त्याला जेऊ घालुन ती घराला कुलुप लावुन सिन्हा बाईंकडे कामाला गेली.आज तीचे चित्त थारयावर नव्हते. काही केल्या तीच्या डोक्यातुन दिपकच्या कृतीचा विचार जात नव्हता, कोणाला सांगायची देखील सोय नव्हती.ती रात्री उशिरा घरी आली तर तीचा नवरा नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आला व सुमनची कसलीही चौकशी न करता तीने सिन्हा बाईकडुन आणलेला डबा स्वतःच फस्त केला, पलंगावर लोळागोळा होऊन पडलेल्या दिपककडे रागाने एक कटाक्ष टाकुन तो अंगणात जाऊन झोपला. सुमनला त्याला दुपारची गोष्ट सांगायची होती पण तीचा नवरा ऐकण्याच्या अवस्थेतच नव्हता, त्यादिवशी सुमन ओक्साबोक्षी खुप रडली पण तीला सावरायला कोणीच आल नाही.  दुसरया दिवशी सुमनने आदल्या दिवशीची गोष्ट नवरयाला सांगितली तसा तो संतापुन उठला व दिपकला लाथाबुक्क्यांनी तुडवु लागला, दिपकला प्रतिकारदेखील करता येत नव्हता.तो नुसता एखाद्या ढोरासारखा ओरडत होता. त्याची ती केविलवाणी अवस्था पाहुन शेवटी सुमनच आडवी आली व तीने नवरयाला थांबवले तसा दिपक एखाद्या लहान निरागस मुलाप्रमाणे तीच्या कुशीत शिरला व रडु लागला.त्याच्या डोळ्यातील गरम अश्रुं सुमनच्या हातावर पडले व त्या अश्रुंनी तीचे मन पिळवटुन टाकले. पण तीला दिपकला आवरणे भाग होते कारण त्याच्या त्या एका कृतीने तो पुरुष असल्याचे सिद्ध केले होते.सुमनला काय करावे तेच सुचत नव्हते. दिपक सुमनच्या मांडीवर डोक ठेवुन रडत रडत झोपी गेला होता, त्याचा बापही अंगणात बाजेवर घोरत पडला होता.झोप फक्त सुमनलाच येत नव्हती.   असेच सात आठ दिवस गेले, दिपकला मार बसल्यानंतर तो शांत झाला आहे अस सुमनला वाटल पण नाही, त्याच्यातील त्या विकृतीने परत डोक वर काढल होत, इतक्यात तो पहीलेपेक्षा जास्त सुमनला त्रास देऊ लागला.त्याला तीचा स्पर्श समजत होता पण आता आई म्हणुन नाही तर एक स्त्री म्हणुन, त्याच्या शरीराला नैसर्गिक लिंगभेद समजायला लागला होता.सुमन त्याच्यासमोर एकटीच दिसत असल्यामुळे व ती त्याला जास्त जवळची असल्यामुळे तीचा त्रास वाढला होता. सुमन त्याला मार मार मारायची पण तो रात्री लहान बाळासारखा कुशीत शिरुन झोपला की सगळं विसरायची.परंतु दिवसेंदिवस जसजशी त्याची विकृती बळावली तशी सुमन मनोमन धास्तावली. तीला आता दिपकसोबत एकट राहण्याची भीती वाटु लागली होती.तीच्या नवरयाला या तीच्या लाचार परीस्थितीशी काहीच घेणदेण नव्हते. तीला कुठेतरी मन मोकळं करायच होत. दिवसेंदिवस दिपक जास्त आक्रमक होत चालला होता, सुमनला आता स्वतःपेक्षा जास्त तीच्या शेजारी राहणारया लहान मुलींची काळजी वाटत होती.सुमन तरी दिपकला मारुन मुटकुन गप्प करायची पण त्याने जर लोकांच्या पोरीबाळींवर अतिप्रसंग केला तर काय करायचे हा प्रश्न तीला जास्त सतावत होता. तीच्या मनातील भीती एक दिवस खरी ठरली.ती कामावर गेली असतांना तीच्या शेजारची मुलगी सहज दिपकला पहायला त्याच्या घरात डोकावली तर दिपकने तीला गच्च पकडुन ठेवली.घाबरल्यामुळे ती मुलगी मोठमोठ्याने रडायला, ओरडायला लागली त्यासरशी तीचे आई वडील धावत तीथे आले आणि दिपकला त्या अवतारात पाहुन संतापले, त्या मुलीच्या वडीलांनी जे हातात मिळेल त्याने दिपकला मारले.संध्याकाळी सुमन घरी आल्यावर तुमची पोलिसांत तक्रार करतो म्हणुन धमकावुन गेले. तो सगळा प्रकार खरच लाजिरवाणा होता. आता सुमनला आपली ममता बाजुला ठेवून दिपकला शिक्षा देणे अनिवार्य होते. दुसरया दिवशी ती मनाशी एक निर्धार करुनच उठली. तीने सकाळीच दिपकला घेऊन पोलीस स्टेशन गाठले.तीने ठाणेदार साहेब व त्यांच्या पुर्ण स्टाफसमोर आपली कर्मकहाणी सांगितली, तीचा नवरा काय करतो म्हणुन पोलीसांनी विचारले तर ती बोलली," साहेब, तो रिक्शा चालवतो, दिवसाला शंभर दिडशे कमावतो, अर्धे पैसे दारुत गमावतो व उरले सुरले तर घरात देतो, मी आपली लोकाचे धुणीभांडी करुन यांना पोसते." तीची सगळी परीस्थिती समजल्यावर तीथे उपस्थित असलेल्यांची मन हेलावली.तीच्या नवरयाला तीथे बोलावुन घेतल्यानंतर विचारपुस केली तर तो निर्लज्जपणे म्हणाला," साहेब, सुमनलाच जास्त पडल होत या पोट्टयाच. हा झाला तेव्हापासुनच असा आहे, मी इला म्हटल की दुसर मुल होऊ दे तर ही यालाच बाबु, सोन्या करत बसली.हा देवाच रुप आहे यालाच आपण वागवु म्हणाली,मंग आता काय वागव म्हणाव, आपल्या करणीची फळ भोगतीया, मी काय करणार याच्यात?" त्याने अस म्हणताच तीथे उभ्या असलेल्या एका अधिकरयाने त्याच्या कानफटात एक मारली, त्यासरशी तो चवताळुन सुमनला म्हणाला," इथ मला बोलावून कशाला आपली इज्जत दाखवतिया? मी म्हणल तेच खर आहे,हे पोलीस काय करणार या दिपकच? यांच्याकडबी याच्यावर उपाय नाही आहे, हे सोंग आपल आपल्यालाच निभवाव लागणार आहे," ते सगळं ऐकुन तीथे जमा असलेल्या सगळयांचीच मन सुन्न झाली.खरच त्यांच्थाकडे तरी या समस्येवर काय तोडगा होता? हे सर्व होत असतांना दिपकच्या गावी काहीच नव्हतं, तो आपल्याच दुनियेत होता.सुमनला राहावर गेल नाही, ती बोलती झाली," साहेब,  नशिबाने काय भोग मांडुन ठेवलेया पहा, एक पोरग दिल ते अस.ज्याला स्वतःच्या राहण्याची, खाण्यापिण्याची अक्कल नाही पण त्याच्यातल जनावर मात्र जागेवर आहे, त्याला बाकी काही समजत न्हाई पण समोरची बाई समजते. त्याला " देवरुप" मानुन मी लहानाच मोठ केल, त्याच सगळं अगदी हागण्या,मुतण्यापासुन ते आंघोळ घालुन देण्यापर्यंत सगळं सगळं केल.हा देवरुप होता , याचच करण्यात आयुष्य जाईल म्हणुन नवरयाने म्हटल तरीबी मी दुसर मुल होऊ दिल नाही.यालाच देव मानलं पण याच्यासोबत नशिबाने एक राक्षसपण जन्माला घातला आहे, हे मला त्यावेळेस समजलं नाही.याच्यातल्या देवासोबत मी एका सैतानालापण मोठ करत होते हे मला आत्त्ता समजल, याने पहील्यांदा मला जेव्हा आई न समजता बाई म्हणुन पाहील , माझा हात याने याच्या शरीराच्या नको त्या ठिकाणी लावला तेव्हाच मला समजल की हा आता देव न्हाई राहीला, याच्यातला सैतान आता जागा होणार.मला त्या दिवशी याच्या अशा वागण्याने रात्रभर झोप आली नाही, पण काय करावे ते समजत नव्हते. मी एक दिवस घरी नसतांना याने शेजारच्या लहान मुलीसोबत तोच प्रकार करायचा प्रयत्न केला, मी न याच्या बापाने, त्या पोरीच्या बापाने लाथाबुक्क्यांनी तुडवला याला.एखाद चार पायाच जनावर असत तर मारुन टाकल असत पण हा माणुस आहे, माझा पोटचा गोळा आहे. हा कसाबी असला तरी माझा खुप जीव आहे याच्यावर. मारुन तर टाकु शकत नाही, आई आहे ना मी, पण दुसरया कोणी याला मारण्या अगोदर तुम्ही तरी याचा काहीतरी निर्णय करा.मला याच काय कराव ते समजल न्हाई म्हणुन तुमच्याकडे आले.मला तुमच्याकडे बोलुन लई हलकं वाटतया आत्ता.मला काही मदत करता आली तर पहा." तीच ते बोलण ऐकुन ते सगळेच अधिकारी, काॅन्स्टेबल्स भारावले.तीला तीथले एक अनुभवी वरीष्ठ अधिकारी दिलासा देत म्हणाले," बाई, तुम्हाला पटत असेल तर बघा, या तुमच्या मुलाला तुम्ही मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या संस्थेच्या कडे सोपवुन देऊ शकता." सुमनला ते  कितपत समजल ते तीच तीलाच माहीती पण साहेब काहीतरी चांगलं करायला सांगतात आहे हे मात्र तीला समजल.तीने आपल्या दिपकच्या भल्याकरता लगेच होकार दिला.त्या साहेबांनी एका त्यांच्या माहीतीतल्या अशा संस्थेला फोन लावुन बोलावुन घेतले व सुमनची सर्व परीस्थिती त्यांना सांगितली.दोन दिवसांनी सुमनला तुमच्या घरी त्या संस्थेचे लोक येतील म्हणुन सांगितले.   त्या दोन दिवसांत सुमनने दिपकला नवीन कपडे आणले, त्याला चांगल चांगल गोडधोड करुन खाऊ घातले, आपल्या कुशीत त्याला घट्ट बिलगुन घेत झोपली. तीचा जीव एकीकडे तो जाणार म्हणुन आक्रंदत होता आणि दुसरीकडे त्याच काहीच तरी कल्याण होईल म्हणुन आनंदलापण होता, तीची द्विधा मनःस्थिती होती.त्या संस्थेने सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांनी त्यांची माणस दिपकला घेण्याकरता आले.त्यादिवशी दिपकला मात्र आपल्यासोबत काहीतरी वेगळं होत आहे इतक जाणवल होत,तो त्या माणसांना जवळ येऊ देत नव्हता, सुमनच्या पाठीमागे सारखा लपत होता.एकाने त्याला पकडायचा प्रयत्न केला तर त्याने त्याच्या हाताला इतका जोरात हिसका दिला की तो माणुस खाली पडला.दिपक आटोक्यात येत नाही हे पाहुन त्यांनी सुमनलाच गाडीमधे बसायला सांगितले, त्याचा परीणाम असा झाला की दिपक तीच्या मागोमाग  गाडीत जाऊन शांतपणे बसला.तो गाडीत बसल्याबरोबर त्याला दोन माणसांनी घट्ट धरुन ठेवले व सुमनला गाडीतुन उतरायला सांगितले.ती उतरल्याबरोबर त्यांनी गाडी लाॅक केली व गाडी निघाली. दिपक गाडीच्या मागच्या काचाजवळ उभा राहुन मोठमोठ्याने रडत होता,  सुमनच्या दिशेने हात पसरुन बघत होता.सुमनला आपल्या देवत्वाची साक्ष देत होता, पण सुमनला आपल्या डोळ्यातील अश्रुंमुळे दिपक धुसर दिसत होता.त्याच्या शरीरात वसलेल्या राक्षसाला आता शिक्षा मिळणार होती पण सुमनचा देव मात्र आपले देवपण सिद्ध करायला टाकीचे घाव सोसायला सुमनपासुन लांब निघाला होता. कदाचित त्याच्यातला माणसालादेखील देवत्व प्राप्त होऊन तो सुमनकडे परत आला असता. 
सौ.माधवी जोशी माहुलकर.
🙏🏻🙏🏻( माझी पोस्ट माझ्या नावासकट शेयर करण्यास माझी काहीच हरकत नाही. )🙏🏻🙏🏻 
#marathi #marathimovies #marathiatricle #marathisongs #oldhindisong #marathibooks #marathibook #marathiwriter #writers #write #writer
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IWFWCS
Similar Posts
वर्तुळ. वर्तुळ. 🎯🎯🎯🎯वर्तुळ लिहीतांना सुद्धा शब्द गोलाकारच जास्त येतात. आकारच तसा आहे याचा.गोल, गरगरीत, वाटोळा, चक्राकार, गोलाकार, गोलाई, गोलार्ध अशी अनेक विशेषणे जरी या शब्दाला असली तरी अर्थ मात्र एकच निघतो.
विसाव्याचे क्षण "थकलो बुवा आज, आज ऑफीसमध्ये काम करायचा कंटाळा येत होता, खुप झोप येत होती, आताशा नको वाटत हे सगळं,"आजकाल पन्नाशीत आलेल्या लोकांचे हे वाक्य आपल्याला घरोघरी ऐकायला मिळतात, खरच ही बाब विचार करायला लावणारी आहे. अडीच अक्षराचा जन्म आणि अडीच अक्षराचा मृत्यु ह्या दोन शब्दांच्या गर्तेतच मनुष्य फिरत असतो.
गजरा "सौमित्र, अरे रात्रीचे अकरा वाजलेत, तुझी आई परत घरात दिसत नाही आहे रे.." नानांच्या त्या हाकेने सौमित्र एकदम आपल्या खोलीतुन बाहेर आला,तसे नानांनी त्याला जवळ घेऊन आई घरात कुठेच दिसत नसल्याचे सांगितले.
मनाचिये गुंती. " मनाचिये गुंती गुंफियेला शेला, बाप रखमादेवीवरु विठ्ठले अर्पिला,मोगरा फुलला, मोगरा फुलला." मला ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या ओळी नेहमीच भुरळ पाडतात.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language